रशियाने सुरु केली थेट लसीकरणाची तयारी


मॉस्को: जगभरात सुरु असलेला कोरोना प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे जगभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ८० लाखांच्या पुढे गेला असून मृतांचा आकडा सात लाखांच्या जवळपास पोहोचला आहे.

याचदरम्यान जगभरातील विविध संशोधन संस्थांमध्ये सुरु असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू झाली आहे. ऑक्सफर्डने तयार केलेल्या मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आल्याने अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातच आता रशियाने थेट सार्वजनिक लसीकरणाची तयारी सुरू केली.

रशियन सरकारकडून ऑगस्टच्या अखेरीस डॉक्टर आणि शिक्षकांना कोरोनाची लस देण्याचा विचार सुरू आहे. याबद्दलचे विधान रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी केले आहे. कोरोना लसीच्या चाचण्या मॉस्कोतील गमालेया संशोधन संस्थेने पूर्ण केल्या असून त्यासाठी आवश्यक नोंदणीचे काम सुरू असल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली. आरोग्यमंत्री मुकाश्को यांनी पत्रकारांना गमालेया संस्थेने तयार केलेल्या कोरोनावरील लसीने चाचण्या पूर्ण केल्याची माहिती दिल्याचे वृत्त स्पुटनिक या वृत्तसंस्थेने दिले आहे.

देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येईल, असे मुकाश्को म्हणाले. सध्या अनेकांवर कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. या चाचणीचे निष्कर्ष उत्सावर्धक असल्याचेदेखील त्यांनी म्हटले. आरोग्य मंत्र्यांच्या विधानाप्रमाणे खरोखरच सार्वजनिक लसीकरण रशियाने सुरू केल्यास तसे करणारा तो जगातील पहिला देश ठरेल. रशियाने याआधीच कोरोना लसीची नोंदणी १० ते १२ ऑगस्ट दरम्यान करणार असल्याचे सांगितले होते. तशा प्रकारची नोंदणी झाल्यास ती जगातील कोरोनावरील पहिली लस ठरेल.