मुंबई पोलिसांची स्तुती करत बिहार पोलिसांवर रोहित पवारांची उपरोधिक टीका


मुंबई – मुंबई पोलिसांवर अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन जोरदार टीका होत असून मुंबई पोलीस मागील दिड महिन्यांपासून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण अद्याप कुठल्याही प्रकारचे यश आलेले नाही. उलट या प्रकरणात बिहार पोलिसांचे आगमन होताच या प्रकरणाला कमालीचा वेग आला. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी बिहार पोलिसांच्या या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. बिहार पोलीस एवढे कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हते. वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन तेथील कायदा व सुव्यवस्थेबाबत ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते एवढे दक्ष असतील असे वाटले नसल्याचे म्हणत त्यांनी बिहार पोलिसांवर उपरोधिक टोला लगावला आहे.

एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सुशांत मृत्यू प्रकरणावर रोहित पवार यांनी भाष्य केले. त्यांनी या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांची स्तुती करत बिहार पोलिसांवर उपरोधिक टीका केली आहे. सुशांत गुणी अभिनेता होता का? तर निश्चितच होता. त्याची आत्महत्या आपल्या सर्वांसाठीच क्लेशदायक असल्यामुळे या घटनेत कुणी दोषी असेल तर त्याचा निष्पक्षपणे तपास व्हायलाच हवा. गुणवत्तेमध्ये जगात ज्या ठराविक पोलिसांचे नाव घेतले जाते, त्यात मुंबई पोलिसांचाही समावेश असल्यामुळे मुंबई पोलीस या घटनेचा सखोल तपास करतील, यात कोणतीही शंका नाही.

बिहारमधील एका सामान्य कुटुंबातील एक तरुण मुंबईत येतो काय… पाहता पाहता चंदेरी दुनियेत यशाच्या शिखरावर पोचतो काय आणि एक…

Posted by Rohit Rajendra Pawar on Saturday, August 1, 2020

चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची त्यांनी या घटनेत आतापर्यंत चौकशीही केल्यामुळे मुंबई पोलीस हे सक्षम असून त्यांच्याकडून योग्य तपास होऊन याप्रकरणी न्याय मिळेल, असा विश्वास आहे. पण दरम्यानच्या काळात सुशांत सिंहच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार बिहारमध्येही याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आणि त्यापाठोपाठ बिहार पोलीस या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबईतही दाखल झाले.

वास्तविक, बिहार पोलीस एवढे कार्यतत्पर असतील हे मला माहित नव्हते. वृत्तपत्रातून किंवा टिव्हीवरुन तेथील कायदा व सुव्यवस्थेबाबत ऐकलेल्या-वाचलेल्या बातम्यांमधून ते एवढे दक्ष असतील असे वाटले नव्हते. की केवळ याच घटनेपुरती त्यांनी तत्परता दाखवली, हे माहीत नाही. पण असो. खरच ते एवढे कर्तव्यदक्ष असतील तर त्यांचे स्वागतच करायला हवे आणि यामुळे बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाणही कमी होईल, अशी अशी अपेक्षा करायलाही हरकत नाही. पण एका लोकप्रिय अभिनेत्याच्या आत्महत्येचे कुणी राजकारण करत असेल तर ते चुकीचे असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.