राम मंदिरासाठी शिवसेनेने दिलेल्या देणगीचा एकही रुपया अद्याप आलेला नाही!


अयोध्या: सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय सुनावत, देशातील हिंदुच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ५ ऑगस्ट रोजी मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्यामुळे सध्या अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. याच दरम्यान राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणजे असा की, राम मंदिरासाठी शिवसेनेने घोषणा केलेल्या १ कोटीपैकी १ रुपयाही आला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच, राम मंदिराच्या निर्माणाचे प्रत्यक्ष काम एका महिन्याच्या आत सुरू होईल. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावले नसल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, सर्वांना बोलावले जाईल. यावेळी शिवसेनेने एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, अजून काही माहिती नाही. आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही. मुरारी बापू देखील दान देणार होते पण अजून पैसे आले नाहीत. पण मंदिराच्या निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नसल्याचेही त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अयोध्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी, मी पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला. मला कळाले की ट्रस्टचे एक बँक अकाऊंट तयार झाले आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्यावतीने १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा, असे ठाकरे म्हणाले होते.

दरम्यान,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे.राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.