भारतीय वृत्तवाहिन्यांवरील बंदी नेपाळने हटवली


काठमांडू – भारत आणि नेपाळमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्या आणि इतर वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. ही बंदी हटवण्यास आता नेपाळने सुरुवात केली आहे. नेपाळ डिश होमचे संचालक सुदीप आचार्य यांनी रविवारी सांगितले की, सर्व भारतीय वाहिन्यांचे प्रसारण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार आता भारतीय वृत्तवाहिन्यांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे.

दोन्ही देशात तणाव वाढल्यानंतर नेपाळने 9 जुलैला भारतीय वृत्तवाहिन्यांवर बंदी घातली होती. नेपाळविरोधात भारतीय वृत्तवाहिन्या वृत्त देत असल्याचे सांगत ही बंदी घालण्यात आली होती. पण, दूरदर्शनचे प्रसारण नेपाळमध्ये सुरू होते. आता नेपाळमध्ये पुन्हा वृत्तवाहिन्यांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. नेपाळच्या संसदेत गेल्या महिन्यात वादग्रस्त नकाशाला मंजुरी देण्यात आल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. या नकाशात नेपाळने कालापानी हा भारताचा भूभाग त्यांच्या नकाशात दाखवल्याने भारताचा त्याला विरोध आहे.