स्वादिष्ट घेवर मिठाई आणि रक्षाबंधन


देशात आता मनभावन श्रावण महिन्याची सुरवात झाली असून या महिन्यात अनेक सण, उत्सव मोठ्या आनंदात साजरे केले जातात. त्यातील भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधनाचा समावेश आहे. या सणाला प्रसिद्ध, चविष्ट घेवर मिठाईचे वेगळे महत्व आहे. राजस्थान आणि ब्रजभूमीमध्ये घेवर विशेष लोकप्रिय आहेत. या महिन्यात देवाला अनेक निमित्ताने ५६ भोग चढविले जातात त्यात घेवर मुख्य आहे.

घेवरशिवाय रक्षाबंधन तसेच हरतालिका अपूर्ण मानली जाते. बहिण घेवर घेऊन भावाकडे राखी बांधण्यासाठी जाते. खास करून पावसाळ्यात ही मिठाई बनविली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. इंग्रजी मध्ये या मिठाईला हनिकोंब डेझर्ट असे नाव आहे. मैदा, आरारूट याचे विशिष्ट प्रकाराने मिश्रण करून, विविध साच्यात घालून घेवर तुपात तळले जातात. नंतर साखरेच्या पाकात बुडवून ते गोड बनविले जातात. पाकात न बुडविताही घेवर खाल्ले जातात. आता पारंपारिक घेवर मध्ये खूप बदल झाले असून लोकांच्या आवडी आणि मागणीनुसार मलई, मावा, पनीर घेवर बनविले जातात. मात्र आजही पारंपारिक रेसिपी अधिक लोकप्रिय आहे.

ताजे नरम, कुरकुरीत घेवर खाणे यात आगळे सुख आहे. गोड घेवर कुस्करून त्याची खीर, पुडिंग बनविता येते. घेवर शिळे झाले कि ते कडक बनतात आणि असे घेवर खिरीसाठी वापरता येतात.

Leave a Comment