बीसीसीआयने थकवले मागील १० महिन्यांपासून क्रिकेटपटूंचे मानधन


नवी दिल्ली – जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असा नावलौकिक असलेल्या बीसीसीआयची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वजन आपण प्रत्येकाने अनुभवले आहे. अनेक खासगी कंपन्या बीसीसीआयला भारतीय संघातील स्टार खेळाडूंमुळे स्पॉन्सरशीप देण्यासाठी आतूर असतात. बीसीसीआयला प्रत्येक वर्षी आयपीएलसारख्या स्पर्धेतून हजारो कोटी रुपयांची कमाई होते. पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका जगातील या सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डालाही बसलेला दिसत असल्याचे चित्र सध्य दिसत आहे. भारतीय संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना गेल्या १० महिन्यांपासून बीसीसीआयने मानधन दिले नसल्याची बाब समोर आल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

बीसीसीआयच्या विविध करारश्रेणीत २७ क्रिकेटपटू मोडले जातात. गेल्या ऑक्टोबरपासून या सर्व खेळाडूंना त्यांचे मानधनच मिळालेले नाही. त्याचबरोबर भारतीय संघाने डिसेंबर २०१९ पासून खेळलेल्या दोन कसोटी, ९ वन-डे आणि ८ टी-२० सामन्यांचे मानधन ही बीसीसीआयने अद्याप दिलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर येते आहे.

बीसीसीआय भारतीय खेळाडूंना A+, A, B आणि C अशा ४ श्रेणींमध्ये विभागले जाते. यात A+ दर्जाच्या खेळाडूंना वर्षाला ७ कोटी (रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह) मानधन मिळते, तर उर्वरित श्रेणींमधील खेळाडूंना अनुक्रमे ५, ३ आणि १ कोटी रुपये वार्षिक मानधन मिळते. याव्यतिरीक्त कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० यासाठी बीसीसीआय आपल्या खेळाडूंना अनुक्रमे १५ लाख, ६ लाख आणि ३ लाख अशी मॅच फी देते.

बीसीसीआयने जाहीर केलेल्या आर्थिक आकडेवारीनुसार, ५ हजार ५२६ कोटी रुपयांचा संस्थेकडे बँक बॅलन्स आहे. याव्यतिरिक्त २ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम बीसीसीआयने एफडी स्वरुपात ठेवली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयने Star India सोबत २०१८ साली भारतीय संघाच्या सामन्यांच्या प्रेक्षपणाचे हक्क देण्यासाठी करार केला, ज्यातून संस्थेला ६ हजार १३८ कोटी रुपये मिळाले. तरीही भारतीय संघातील करारबद्ध खेळाडूंना १० महिन्यांपासून आपले मानधन मिळालेले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.