अटल बिहारी वाजपेयींचा विक्रम नरेंद्र मोदींनी काढला मोडीत


नवी दिल्ली – आणखी एका विक्रमाची नोंद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर झाली आहे. नरेंद्र मोदींनी भाजपचे सर्वात प्रदीर्घकाळ असलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा विक्रम देखील त्यांनी मोडीत काढला आहे. तसेच, पंतप्रधान पदावर सर्वात जास्त काळापर्यंत असलेले गैरकाँग्रेसी नेते म्हणून देखील पंतप्रधान मोदींनी विक्रम केला आहे.

अटल बिहारी वाजपेयी हे मोदींच्या अगोदर सर्वात प्रदीर्घकाळ गैरकाँग्रेसी पंतप्रधान होते. तर, अटल बिहारी वाजपेयी हे सलग २ हजार २५६ दिवस पंतप्रधान पदावर होते. अटल बिहारी वाजपेयी १९ मार्च १९९८ रोजी पंतप्रधान बनले होते. जे सलग २२ मे २००४ पर्यंत पंतप्रधान पदावर होते. त्यांचा पहिला कार्यकाळ १९ मार्च १९९८ ते १३ ऑक्टोबर १९९९ पर्यंत होता. तर दुसरा कार्यकाळ १३ ऑक्टोबर ते २२ मे २००४ पर्यंत होता.

तर, २ हजार २६० दिवसांपासून आजतागायत पंतप्रधान पदावर सद्यस्थितीस देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असलेले नरेंद्र मोदी हे कायम असल्यामुळे पंतप्रधान पदावर सर्वात जास्त काळ राहिलले पहिले गैरकाँग्रेसी व भाजप नेता म्हणून त्यांच्या नावे विक्रम झाला आहे.

२६ मे २०१४ पासून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ सुरू झाला असून, तो अद्यापही सुरूच आहे. भाजप २०१४ मध्ये प्रचंड बहुमत मिळवत देशात सत्तेत आल्यानंतर २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती. २०१९ मध्ये त्यांचा पहिला कार्यकाळ संपला होता. मात्र, पुन्हा एकदा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत सत्ता मिळवली आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले.

देशाला स्वातंत्र्यानंतर १९४७ पासून ते २०२० पर्यंत १५ पंतप्रधान मिळाले आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे. ६ हजार १३० दिवस ते पंतप्रधान पदावर होते. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नावावर सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधी ५ हजार ८२९ दिवस पंतप्रधान पदावर होत्या. २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ म्हणजेच ११ वर्षे ५९ दिवस त्या सलग पंतप्रधान पदावर होत्या. त्यानंतर दुसऱ्यांदा १४ जानेवारी १९८० पासून ते ३१ ऑक्टोबर १९८४ पर्यंत पंतप्रधान पद त्यांनी सांभाळले. इंदिरा गांधींच्या नंतर मनमोहन सिंग हे सर्वाधिक काळापर्यंत पंतप्रधान पदावर होते. ते यूपीए -१ व यूपीए -२ सरकारमध्ये २००४ ते २०१४ पर्यंत म्हणजेच १० वर्षे पंतप्रधान होते. त्यांच्या नावावर ३ हजार ६५६ दिवस पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम आहे.