गुजरातच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती


अहमदाबाद – खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील अर्थात सीआर पाटील यांची भारतीय जनता पार्टीने गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे. सीआर पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, तसेच गुजरातमधील नवसारी येथील ते खासदार आहेत.

जीतूभाई वाघाणी यांच्याकडे या अगोदर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता पक्षाने या पदासाठी सीआर पाटील यांची निवड केली आहे. गुजरातमधील आगामी पोटनिवडणुका, जिल्हा व तालुका पातळीवरील निवडणुकांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

सीआर पाटील यांच्याकडे एक टेक्नोसॅव्ही नेता म्हणूनही पाहिले जाते. सोशल मीडियाचा वापर करून ते कायम आपला जनसंपर्क वाढवत असतात. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राउट त्यांचे जन्मगाव आहे. १९६० मध्ये भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर पाटील यांचे कुटुंब गुजरातमध्ये स्थलांतरित झाले. यानंतर त्यांचे संपूर्ण शिक्षण गुजरातमध्येच झाले. १९८९ मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत सीआर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी सूरतचे भाजपचे खजिनदार म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे.