कोरोनामुक्त झालेल्या बिग बींना अखेर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना तब्बल २३ दिवसांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. बिग बींचा करोना रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती अभिषेक बच्चनने ट्विट करत दिली. बिग बींचा कोरोना रिपोर्ट ११ जुलै रोजी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच दिवशी रात्री त्यांना नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बच्चन कुटुंबियांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात अभिषेक बच्चनचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ११ जुलै रोजी अभिषेक बच्चनलाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान अभिषेकने ट्विट करत सुदैवाने माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते आता घरीच आराम करतील. तुम्हा सर्वांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल तुमचे मनापासून आभार, असे म्हटले आहे. पण अद्याप अभिषेक बच्चन रुग्णालयातच आहे.