राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन

राज्यसभा खासदार आणि समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांचे वयाच्या 64व्या वर्षी निधन झाले आहे. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मागील काही महिन्यांपासून सिंगापूरमध्ये उपचार सुरू होते. त्यांचे मुत्रपिंड प्रत्यारोपण देखील करण्यात आले होते. ते मागील दीड महिन्यांपासून आयसीयूमध्ये भरती होते.

एकेकाळी अमर सिंह हे उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे नेते मानले जात असे. ते मुलायम सिंह यादव यांच्या देखील जवळचे होते. त्यांच्या मृत्यूची बातमी येण्याच्या 2 तास आधीच त्यांनी बाळ गंगाधर टिळक यांच्यासंदर्भातील ट्विट केले होते.

अमर सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी सांगायचे उद्योगपती ते राजकीय नेते बनलेले अमर सिंह हे समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते होते. 1996 साली त्यांची सर्वात प्रथम राज्यसभा खासदार म्हणून निवड झाली होती. 2010 साली मात्र त्यांची मुलायम सिंह यादव यांनी हकालपट्टी केली होती. 2011 मध्ये त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष राष्ट्रीय लोक मंचची सुरुवात करत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक देखील लढवली होती. यानंतर 2014 साली ते राष्ट्रीय लोकदल पक्षात सहभागी झाले होते. 2016 साली ते पुन्हा समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेत निवडून आले होते.