या माऊलीला सलाम, मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसुत्र गहाण ठेवून खरेदी केला टिव्ही

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे देशभरातील शाळा-महाविद्यालये अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण टिव्ही-ऑनलाईन माध्यमातून सुरू आहे. मात्र प्रत्येकाकडे स्मार्टफोन, टिव्ही असेलच असे नाही. अशाच एका महिलेने घरात टिव्ही नसल्याने, मुलांच्या शिक्षणासाठी जे केले ते वाचून तुम्ही देखील या माऊलीला सलाम कराल.

या माऊलीने आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मंगळसुत्र देखील गहाण ठेवले. मंगळसुत्र गहाण ठेवल्यानंतर जे पैसे आले, त्या पैशातून महिलेने टिव्ही सेट खरेदी केला. कर्नाटकच्या गडग जिल्ह्यातील नागानुर गावात ही महिला राहते.  येथील कस्तूरी चलवदी नावाच्या या माऊलीने आपल्या 4 मुलांच्या शिक्षणासाठी 12 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसुत्र गहाण ठेवले व त्यातून टिव्ही खरेदी केला.

यामुळे आता मुले दुरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या क्लासेस पाहून मुले शिकू शकतील. याबाबतची माहिती तहसीलदाराला समजताच त्यांनी त्वरित अधिकाऱ्यांना याची माहिती घेण्यासाठी पाठवले. प्रकरण चर्चेत आल्याचे लक्षात येते मंगळसुत्र स्वतःकडे ठेवलेल्या व्यक्तीने मंगळसुत्र परत देण्याची देखील तयारी दर्शवली व जेव्हा पैसे येतील तेव्हा परत करण्यास सांगितले.

कस्तूरी चलवदी यांनी सांगितले की, आता मुले दुरदर्शन बघून अभ्यास करतात. आमच्याकडे टिव्ही नव्हता. मुले दुसऱ्यांच्या घरी जात असे. शिक्षकांनी टिव्ही बघण्यास सांगितले. कोणीही कर्ज न दिल्याने मंगळसुत्र गहाण ठेवून टिव्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला. महिलेचे पती मजूर आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे काही काम देखील मिळत नाही. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर या गरीब महिलेला टिव्ही खरेदी करून देण्यासाठी स्थानिक लोकांनी पैसे जमा केले. काही नेत्यांनी देखील आर्थिक मदत केली.