चीनचा खोडसाळपणा, आता लिपुलेख पासजवळ तैनात केले सैन्य

मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये एलएसीवर तणाव सुरू आहे. चीनने आपले सैन्य मागे घेतल्याचे सांगितले जात होते, मात्र वास्तविक स्थित वेगळी असल्याचे सेटेलाईट फोटोवरून स्पष्ट झाले आहे. चीन एलएसीवर आपल्या सैन्याची तैनाती वाढवत आहे. आता चीनने उत्तराखंडच्या लिपुलेख पासजवळ पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या सैन्याची तुकडी तैनात केली आहे.

न्यूज18 च्या वृत्तानुसार, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. पुर्व लडाख भागात मागील दोन महिन्यांपासून भारत-चीनमध्ये संघर्ष सुरू आहे. या संघर्षात भारताचे काही सैनिक शहीद झाले होते.

दोन्ही पक्षाने सैन्य आणि राजकीय स्तरावर तणाव कमी करण्यासाठी चर्चा देखील केली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या चर्चा झाल्यानंतर चीन सैन्य मागे घेण्यास तयार देखील झाले होते. मात्र आता लिपुलेख येथे चीनने आपली सैन्य संख्या वाढवली आहे. जवळपास 1 हजार सैन्य सीमेपासून काही अंतरावर तैनात केल्याचे सांगितले जात आहे.