लवकरच या सात नवीन मार्गांवर देखील धावणार बुलेट ट्रेन

देशातील बुलेट ट्रेनचे नेटवर्क वाढणार असून, भारतीय रेल्वेने हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी नवीन 7 मार्गांची निवड केली आहे. यासाठी लवकरच रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) मिळून जमीन अधिग्रहणाचे काम सुरू करेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपुर्वी पार पडलेल्या बैठकीत जमीन अधिग्रहणाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यासाठी 4 सदस्यांच्या समितीचे गठन करण्यात आले आहे.

बुलेट ट्रेन हाय स्पीड कॉरिडोरवर ताशी 300 किमी वेगाने धावू शकते. तर सेमी हाय स्पीड कॉरिडोरवर ट्रेन ताशी 160 किमी वेगाने धावू शकते. या संदर्भात रेल्वे बोर्डाने एनएचएआयला पत्र लिहित या 7 हाय स्पीड कॉरिडोर संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. यासंदर्भातील प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जात आहे.

भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनवर वेगाने काम सुरू आहे. अहदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणारी ट्रेन डिसेंबर 2023 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या सात नवीन मार्गांमध्ये दिल्ली ते वाराणसी (नोएडा, आग्रा आणि लखनऊ), वाराणसी ते हावडा (वाया पटना), दिल्ली ते अहमदाबाद (वाया जयपूर आणि उदयपूर), दिल्ली ते अमृतसर (वाया चंडीगढ, लुधियाना आणि जालंधर), मुंबई ते नागपबर (वाया नाशिक), मुंबई ते हैदराबाद (वाया पुणे) आणि चेन्नई ते म्हैसूर (वाया बंगळुरू) यांचा समावेश आहे.