अक्षय कुमारने मुंबई पोलिसांना दिले खास फिटनेस डिव्हाईस, आदित्य ठाकरेंनी मानले आभार

अभिनेता अक्षय कुमार आपल्या चित्रपटांसोबतच सामाजिक कार्यासाठी देखील ओळखला जातो. कोरोना व्हायरस महामारी संकटात देखील त्याने मोठ्या प्रमाणात मदत निधी दिला. आता अक्षयने नाशिक पोलिसानंतर मुंबई पोलिसांना खास फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाईस दिले आहे.

हे डिव्हाईस कोव्हिड योद्धांना ऑक्सिजन, शरीराचे तापमान आणि ह्रदयाच्या गतीबाबत माहिती देईल. याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट करत अक्षयचे आभार मानले.

आदित्य ठाकरेंनी अक्षय कुमार सोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, आज अक्षय कुमारजीने मुंबई पोलिसांना फिटनेस-हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाईस दिले. हे सलग ऑक्सिजन, शरीराचे तापमान आणि हर्ट रेटबाबत माहिती देते. कोव्हिडच्या लढ्यात हे उपयोगी आहे.

त्यांनी देशातील सशस्त्र दल आणि पोलिसांना नेहमीच पाठिंबा दिला आहे. कोव्हिड योद्धांबाबतच्या त्यांच्या काळजीबाबत मी त्यांचे आभार मानतो. सोबतच बीएमसीला देखील असे डिव्हाईस देण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली.