हाय-प्रोफाईल ट्विटर अकाउंट हॅक प्रकरणात 17 वर्षीय युवकाला अटक

मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरील बराक ओबामा, एलॉन मस्क, बिल गेट्स सारख्या जगभरातील महत्त्वाच्या 130 लोकांचे अकाउंट हॅक झाल्याची घटना समोर आली होती. या हाय-प्रोफाईल हॅकमध्ये आता फ्लोरिडा येथील एका युवकाला अटक करण्यात आले आहे. जगाभरातील या मोठ्या व्यक्तींचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यामागे 17 वर्षीय युवकच मास्टरमाइंड असल्याचे सांगितले जात आहे. हे अकाउंट्स हॅक करून हॅकर्सने बिटकॉईन्सची मागणी केली होती.

हॅकिंगच्या एवढ्या मोठ्या प्रकरणानंतर ट्विटरच्या सुरक्षेवर प्रश्ननिर्माण झाले होते. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की 17 वर्षीय ग्राहम इव्हान क्लार्क या पुर्ण हॅकिंगशी जोडलेला असून, तोच यामागचा मास्टरमाइंड आहे. फेडरल अधिकारी ट्विटर हॅकच्या आधीपासूनच क्लार्कचा शोध घेत होते. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत चौकशी केली जात आहे. त्याच्या व्यतिरिक्त 19 आणि 22 वर्षीय अशा दोन तरुणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

केवळ 17 वर्षांच्या वयात क्लार्कने याआधी देखील अनेक हॅकिंग्स केल्या आहेत. सिक्रेट सर्व्हिसने एप्रिलमध्ये त्याच्याकडील 7 लाख डॉलर्सपेक्षा अधिक मुल्याचे बिटकॉईन जप्त केले होते.

130 ट्विटर अकाउंट हॅक केल्यानंतर या अकाउंटवर ट्विट, डायरेक्ट मेसेज करण्यात आले होते. तसेच, काही अकाउंट्सची संपुर्ण माहिती डाऊनलोड करण्यात आली होती. हॅकर्सने बिटकॉईनची मागणी केली होती.