रिया चक्रवर्तीने नियुक्त केलेल्या वकिलाची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क


सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सुशांतच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे रिया चक्रवर्तीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तिच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आपला बचाव करण्यासाठी रिया चक्रवर्तीनेदेखील शक्य ते सर्व मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी रियाने देशातील प्रसिद्ध आणि महागड्या वकिलाला नियुक्त केले आहे. रियाची केस प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे हाताळत आहेत. याआधी अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस सतीश यांनी हाताळल्याचे वृत्त झी न्यूजने बॉलिवूड लाइफच्या हवाल्याने दिले आहे.

बुधवारी सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले. रिया चक्रवर्तीविरोधात सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी खळबळजनक आरोप केल्यानंतर बिहार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, रियाने यात जामीन मिळवण्यासाठी अभिनेता सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढणाऱ्या भारतील प्रसिद्ध वकिलांपैकी एक असलेल्या मानशिंदे यांची नियुक्ती केली आहे.

सलमान खानच्या १९९८ मधील काळवीट शिकार आणि संजय दत्तच्या १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली होती. सलमान खानला ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणात सतीश मानशिंदे यांनी जामीनही मिळवून दिला होता. देशातील महागड्या वकिलांपैकी सतीश मानशिंदे एक असून २०१० मधील एका रेकॉर्डनुसार ते दिवसाला १० लाख रुपये फी घेतात. त्यांचे वय ५० असून महागड्या गाड्यांची त्यांना आवड आहे. सतीश मानशिंदे यांनी मंगळवारीच रियाच्या अटकपूर्व जामीनाचे कागदपत्र तयार केले असून, मंगळवारी रात्री त्यांच्या सहाय्यक वकील आनंदिनी फर्नांडिस या रियाच्या घराबाहेर दिसल्या होत्या.