चिंता वाढवणारी बातमी! कोरोना बळींच्या संख्येत भारत जगात पाचव्या स्थानी


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोना संकट अद्यापही कमी झालेले नाही. त्यातच मागील काही दिवसांपासून देशभरातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दररोज ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णांची वाढ होत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे केंद्र तसेच देशभरातील राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांचा आकडा देखील वाढत चालला आहे. भारतात शुक्रवारी कोरोनामुळे झालेल्या मृत्युच्या संख्येत ७७९ ची वाढ झाल्यामुळे मृत्यु झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

मागील २४ तासात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची संख्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली. त्याचबरोबर मृतांची आणि बरे होऊन घरी परलेल्या रुग्णांची आकडेवारीही जाहीर केली होती. देशात मागील २४ तासात ५५ हजार ७९ नवीन रुग्ण आढळून आले. तर ७७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ एवढी झाली आहे. तर देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७४७ एवढी झाली आहे. यात धक्कादायक आणि चिंतेची बाब म्हणजे यातील १८००० रुग्णांचा मृत्यु एकट्या जुलै महिन्यात झाला आहे. रुग्णांच्या मृत्यु संख्येबरोबरच भारत जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यु झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.