लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये असलेले महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही – फडणवीस


मुंबई – सध्या पुण्या-मुंबईसह राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत असल्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा उच्चांक गाठेल. पण सप्टेंबरमध्ये रुग्ण संख्या हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल. पण यामुळे घाबरुन जाण्याची कोणतही गरज नसून यंत्रणेने सतर्क राहून उपाययोजना करावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी येथे सांगितले. तर, दुसरीकडे कोरोनाबद्दल परिस्थितीबद्दल मत मांडताना, राज्य सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कोरोना परिस्थिती, महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राचे व्हिजन याबद्दल आपले मत मांडले. यावेळी फडणवीस यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार कमी पडत असून कोरोनाशी ज्या ताकदीने लढायला हवे, तेवढ्या ताकदीने राज्य सरकार कोरोनाशी लढत नाही. कोरोनाच्या मुंबईतील टेस्ट वाढवायला हव्या, पण टेस्टही वाढविण्यात येत नाहीत, देशात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर महाराष्ट्रात असल्याचेही त्यांनी सांगितले.

फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत मदभेदाबद्दल आणि सरकारच्या 5 वर्षीय कालखंडाबाबत राज्य सरकारला चिमटा काढला. या सरकारचे स्टेअरिंग कुणाच्या हाती आहे, हेच कळत नाही. हे सरकार लिव्ह इन-रिलेशनमध्ये आहे, कुटुंब नाही, त्यामुळे सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.