१० किंवा १२ ऑगस्टला होणार रशियाने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची नोंदणी


मॉस्को : १० किंवा १२ ऑगस्टला रशियाने बनविलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीची औषध नियंत्रकांकडे नोंदणी करून त्यानंतर ती तीन ते सात दिवसात जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी चाचण्या व प्रथम शोध कोण लावतो याबाबत जगात विविध देशांमध्ये स्पर्धा चाललेली असताना, त्यात रशिया बाजी मारणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

ही कोरोना प्रतिबंधक लस मॉस्कोमधील गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिऑलॉजी अँड मायक्रोबायॉलॉजी (जीआरआयइएम) या संस्थेने विकसित केली आहे. त्याचबरोबर या महिन्याच्या सुरवातीलाच रशियाने या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीनही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे जाहीर केले होते. पण, प्रत्यक्षात वस्तुस्थिती थोडी वेगळी होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण झाला होता. त्या चाचण्यांचा दुसरा टप्पा १३ जुलैला सुरू झाला, असे रशियाच्या तास या वृत्तसंस्थेने म्हटले होते.

कोणत्याही लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे पूर्ण झाल्याशिवाय तिचा वापर जनतेसाठी करण्यास परवानगी देण्यात येत नाही. मानवी चाचण्यांचा प्रत्येक टप्पा कित्येकदा काही महिन्यांपर्यंत सुरू राहातो. त्यामुळे रशियाने विकसित केलेल्या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर तिसरा टप्पा टाळून तिच्या वापरास परवानगी देण्याचा घाट तेथील सरकारने घातला असावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रशियातील औषध नियंत्रकांनी जीआरआयइएम या संस्थेने तयार केलेल्या लसीची सशर्त नोंदणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा या लसीला पूर्ण करावाच लागेल आणि त्यानंतरच जनतेसाठी या लसीचा वापर करण्याकरिता परवानगी मिळू शकेल.