सोनू सूदच्या समाजकार्यावर राज ठाकरेंनी उपस्थित केली शंका


मुंबई – देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्राने मोठा निर्णय घेत देशात लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर सर्वच उद्योगधंदे ठप्प झाल्यामुळे हातावर पोट असलेल्या स्थलांतरित मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच वाहतूक सेवा बंद असल्यामुळे या मजुरांनी पायीच घरचा रस्ता पकडला होता. त्यावेळी अनेक स्थलांतरित मजुरांची अभिनेता सोनू सूदने स्वःखर्चाने घरवापसी केल्यामुळे सध्या सोनू सूदचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनीही त्याच्या कामाचे कौतुक केले आहे. पण त्याचबरोबर त्याच्या या समाजकार्यावर एक शंकाही उपस्थित केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझे व्हिजन कार्यक्रमात राज्यातील कोरोनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले. अभिनेता सोनू सूदने केलेल्या कामाविषयी प्रश्न या कार्यक्रमातच त्यांना विचारण्यात आला. राज ठाकरे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना एक शंका उपस्थित केली.

राज ठाकरे म्हणाले, मला एक कळत नाही की, सोनू सूदला ही आर्थिक मदत आली कुठून? या गोष्टी आपल्या थोडसे तपासणे गरजेचे आहे. इच्छा प्रत्येकाच्या असतात. पण, शेवटी त्याला आर्थिक बाजू देखील असते. ही आर्थिक बाजू सोनू सूदकडे कुठून आली? सोनू सूद असा फार मोठा कलाकार नाही. पण तो जे करत आहे हे चांगले करत आहे आणि केले देखील असेल. परंतु हे एकट्या सोनू सूदच डोके आहे, असे मला वाटत नाही. याबाबत आपल्याला कालांतराने कळेल यामागे काय काय डोकी होती. आतातरी थांगपत्ता लागत नसल्याचे म्हणत राज ठाकरे यांनी आर्थिक स्त्रोतांविषयी शंका उपस्थित केली.