पावसात भिजत भाषण करा आणि निवडणुका जिंका; रावसाहेब दानवेंचा पवारांना टोला


औरंगाबाद: जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला असून आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर छोटेखानी सभेला संबोधित करताना त्यांनीही टोलेबाजी केली. यावेळी बोलताना दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नाव न घेता पावसात भिजत भाषण केल्यामुळे यश मिळत असते. कदाचित हे पुढचे संकेत असू शकतात. त्यामुळे पाऊस होताच मी उभा राहिलो, असा टोला लगावल्यामुळे एकच हशा पिकला.

दरम्यान रावसाहेब दानवे हे भाषणासाठी उभे राहिलेले असतानाच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तरीही देखील त्यांनी आपले भाषण सुरू ठेवले. भाषण सुरू असताना पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांनी तोच धागा पकडत पावसात भिजून भाषण केल्याने यश मिळत असते. त्यात मिरुग पडला तर नक्कीच यश मिळते. कदाचित हे पुढचे संकेत असू शकतात. त्यामुळे पाऊस होताच मी उभा राहिलो, अशी टीका दानवे यांनी केली.

दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना दानवे यांनी तीन पक्षाच्या हातात तीन स्टेअरिंग असल्यामुळे त्यांची गाडी कुठपर्यंत चालेल हे माहीत नाही. पण राज्याच्या हिताच्या स्टेअरिंग नेहमी एकाच्याच हातात असावे. स्टेअरिंग आमच्या हातात असावे अशी काही आमची अपेक्षा नाही. राज्याच्या हितासाठी त्यांनी काम करावे आणि राज्याचे भले करावे. पण आपसातील वादामुळे स्टेअरिंगवरचा हात निसटला आणि अपघात झाला तर स्टेअरिंग आम्ही हातात घेऊ. आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ आणि स्वबळावर लढून सत्ता आणू, असा विश्वास देखील यावेळी व्यक्त केला.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले. सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवून आपआपली ताकद दाखवावी, असे पाटील म्हणाले होते. मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणुका लढवल्या गेल्या आणि निवडून आल्यानंतर ज्यांच्यासोबत निवडणुका लढवल्या त्यांच्यासोबत न जाता दगाफटका करून दुसऱ्यांशी संगनमत करण्यात आले. त्याबद्दल चंद्रकांत पाटील बोलले होते. पण त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.