देहविक्रय काम करणाऱ्या महिलांच्या 25 मुलींची जबाबदारी घेणार गौतम गंभीर!


नवी दिल्ली – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत तर अनेकांच्या हाताला काम नाही. त्यातच समाजात देहविक्रय करणार वर्ग कायमच दुर्लक्षित असतो. त्यांच्याकडे सहसा कुणीच लक्ष देत नाही. पण दिल्लीतील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचचले आहे.

दिल्लीतील जीबी रस्त्यावरील भागात देहविक्रयाचे काम करणाऱ्या महिलांच्या २५ मुलींचे पुढील सर्व शिक्षण, त्यांचे आरोग्य आणि त्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाणार असून आजपासून या कामाला गौतम गंभीर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या ‘पंख’ या संस्थेच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे.

१० मुलींची यासाठी आधीच निवड झालेली आहे आणि अन्य १५ मुलींचा शोध सुरू आहे. प्रत्येकाला चांगले आयुष्य जगण्याचा हक्क असल्यामुळेच आम्ही याची त्याच उद्देशाने सुरवात केल्याचे गौतम गंभीरने सांगितले. निवडलेल्या १० मुलींचे शिक्षण सरकारी शाळेत होणार असून शाळेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा खर्च आमची संस्था उचलणार आहे. तसेच त्यांचे समुपदेशन देखील केले जाणार आहे, म्हणजेच ते स्वतःला या समाजाचा एक घटक मानतील आणि ते सक्षमपणे आपले जीवन जगू शकतील.

याबाबत माहिती देताना गंभीरने सांगितले की, माझ्या आजीचा शुक्रवारी जन्मदिवस आहे. आम्ही या कार्याला त्यांच्याच आशीर्वादाने सुरवात करत आहोत आणि या कामाचे सर्व श्रेय त्यांनाच जाते. देशासाठी बलिदान दिलेल्या २०० हुतात्मांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची संस्था काम करत आहे.