धक्कादायक ! अमेरिकेत कोरोना पॉजिटिव्ह कुत्र्याचा मृत्यू

कोरोना व्हायरसच्या विळख्यात आता माणूसच नाही तर प्राणी देखील अडकू लागले आहेत. अनेक प्राण्यांना या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत देखील एक कुत्रा कोरोना पॉजिटिव्ह आढळला होता. आता या कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

या कुत्र्याचे नाव बडी होते व जर्मन शेफर्ड प्रजातीचा हा कुत्रा सात वर्षांचा होता. एप्रिल महिन्यात त्याच्यात कोरोनाचे लक्षण आढळले होते. कुत्र्याचे मालक रॉबर्ट मॅहोनी हे न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्यांना देखील एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती.

बडीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. एखाद्या कुत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची ही अमेरिकेतील पहिलीच घटना होती. या कुत्र्याची स्थिती अधिकच गंभीर झाल्याने अखेर, 11 जुलैला त्याचा मृत्यू झाला.

कुत्र्याच्या रक्ताच्या चाचणीत रोगप्रतिकारक शक्तीचा कर्करोग देखील आढळला होता. मात्र हे स्पष्ट झाले नाही की त्याचा मृत्यू कोरोना संसर्गामुळेच झालेला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 12 कुत्रे, 10 मांजरी, एक सिंह आणि एका वाघाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलेले आहे.