अखेर ईडीकडून रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल


नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रवर्तन प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत 15 कोटींच्या ‘संशयास्पद व्यवहारांवर’ बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची चौकशी एजन्सीने दखल घेतल्यानंतर दाखल करण्यात आला आहे. सध्या सुशांतच्या खात्यातून ट्रान्सफर झालेल्या पैशांचा कसा वापर करण्यात आला याचा तपास केला जात आहे.

गेल्या तीन दिवसांपासून बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत तळ ठोकून आहेत, त्याचबरोबर ते अनेक बँकांना भेटी देऊन रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबत सुशांतने स्थापन केलेल्या दोन कंपन्यांच्या व्यवहार आणि गुंतवणूकीची चौकशी करण्यात येत आहे. रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरून सुशांतच्या बँक खात्यातून बेकायदेशीरपणे पैसे ट्रान्सफर करून मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. बिहार पोलिसांनी आज सकाळी या प्रकरणातील पैशाचा मागोवा घेण्याचा आग्रह धरला.

तत्पूर्वी अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि काही इतरांविरूद्ध दाखल केलेल्या एफआयआरची प्रत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बिहार पोलिसांकडे मागितली आहे. या प्रकरणातील मनी लाँड्रिंग’चा शोध घेण्यासाठी एफआयआरची प्रत मागविण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने यासंदर्भात बिहार पोलिसांना पत्र लिहिले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रॉव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत संभाव्य चौकशीसाठी ईडी या प्रकरणाचा विचार करत आहे. सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह यांनी मंगळवारी रिया चक्रवती, तिच्या कुटुंबातील सदस्यांसह सहा जणांविरुद्ध मुलाला आत्महत्येच्या आरोपाखाली एफआयआर दाखल केला होता.