सीरम-ऑक्सफर्डच्या लसीच्या मानवी चाचणीला तज्ज्ञांच्या समितीचा खोडा


नवी दिल्ली : इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार होत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यासंदर्भात डीसीजीआयच्या समितीने परवानगी देण्याचे निर्णय घेण्याचे टाळले आहे. त्याचबरोबर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला या समितीने ही परवानगी मिळविण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला आहे.

अ‍ॅस्ट्राझेनिसा कंपनीच्या सहकार्याने ऑक्सफर्ड विद्यापीठ कोरोना प्रतिबंधक लस विकसित करत आहे. अ‍ॅस्ट्राझेनिसाशी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कमी व मध्यम स्तराचे उत्पन्न असलेल्या देशांसाठी या लसीचे उत्पादन करण्यासाठी करार केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार होत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या भारतात सुरू करण्यासाठी सीरमने सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे तज्ज्ञांच्या समितीने सांगितले.

आठ दुरुस्त्या सीरमच्या प्रस्तावात सुचविण्यात आल्या असून सीरमला या घडामोडींमुळे मानवी चाचण्या सुरू करण्यासाठी लगेच परवानगी मिळणे शक्य नाही. सीरमने या विषयावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार होत असलेल्या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील मानवी चाचण्यांसाठी १६०० स्वयंसेवक हवे असल्याचे सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्याबाबत सीरमकडून आणखी माहिती समितीने मागविली आहे.