कोरोनावर मात करणाऱ्या ब्राझील राष्ट्रपतींच्या फुफ्फुसात ‘मोल्ड’, जाणून घ्या काय आहे आजार

ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांना काही दिवसांपुर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ते बरेच दिवस आयसोलेशनमध्ये होते. आता बोल्सोनारो यांनी त्यांच्या फुफ्फुसामध्ये मोल्ड असल्याचे सांगितले आहे. यामुळे त्यांना कमकुवतपणा जाणवत असून, ते यासाठी अँटीबायोटिक्स औषधे घेत आहेत.

जायर यांनी सांगितले की, त्यांनी रक्ताची चाचणी केल्यावर आढळले की फुफ्फुसात मोल्ड झाला आहे. एका लाईव्ह स्ट्रिमिंग दरम्यान त्यांनी याबाबतची माहिती दिली. फुफ्फुसामध्ये मोल्ड होण्याचा अर्थ फुफ्फुसामध्ये कॅव्हिटी म्हणजेच रिकाम्या जागी बॅक्टेरियल/फंगल स्पोर्स होतात. वेळेवर उपचार न केल्यास यामुळे व्यक्तीला टीबी देखील होऊ शकतो. या दरम्यान फुफ्फुस कापसाच्या फुलाप्रमाणे दिसते. यामुळे श्वास घेण्यास समस्या निर्माण होते.

दरम्यान, ब्राझीलच्या प्रथम महिला आणि एका कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. देशाच्या प्रथम महिला मिशेल बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर जायर बोल्सोनारो यांनी दोन आठवड्यांच्या लढ्यानंतर कोरोनावर मात केली होती.