मॉडर्नाच्या कोरोना प्रतिबंधक लसीची माहिती चोरण्याचा चीनकडून प्रयत्न


मॉर्डना कंपनीचा महत्वपूर्ण डेटा चोरण्याचा प्रयत्न चीन सरकारशी संबंधित असलेल्या हॅकर्सनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून चिनी हॅकर्सनी या वर्षाच्या सुरुवातीला मॉर्डनाचा महत्त्वपूर्ण डेटा चोरण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीमध्ये मॉर्डना आघाडीवर असलेली कंपनी आहे.

आता तिसऱ्या टप्प्यातील या कंपनीने बनवलेल्या लसीच्या चाचण्या सुरु झाल्या असून ही माहिती चीनच्या हॅकिंगच्या हालचालीवर लक्ष ठेऊन असलेल्या अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेच्या न्याय खात्याने मागच्या आठवड्यात दोन चिनी नागरिकांवर अमेरिकेत हेरगिरी करत असल्याचा आरोप ठेवला होता. त्यांना वैद्यकीय संशोधनासंबंधी माहिती चोरायची होती.

कोरोना व्हायरसच्या लसीवर काम करणाऱ्या मॅसाच्युसेटसमधील बायोटेक कंपनीच्या कॉम्प्युटर सिस्टिममधुन डेटा चोरण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. मूळची मॅसाच्युसेटस स्थित मॉर्डना ही कंपनी असून जानेवारी महिन्यात त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणार असल्याचे जाहीर केले होते.

मॉर्डनाचे अधिकारी हँकिंगच्या शक्यतेमुळे सुरुवातीपासून जागरुक होते. त्यासाठी त्यांनी एक अंतर्गत टीम बनवली होती. त्याशिवाय बाहेरुन मदत घेतली होती. धोका कितपत आहे, ते समजून घेण्यासाठी यंत्रणांच्या ते कायम संपर्कात होते. ही सर्व काळजी घेऊन आम्ही आमची माहिती सुरक्षित ठेवल्याची माहिती कंपनीचे प्रवक्ते रे जॉर्डन यांनी सांगितले.

कुठल्या कंपन्यांची माहिती चोरण्याचा चिनी हॅकर्सनी प्रयत्न केला त्याबद्दल एफबीआय आणि अमेरिकेच्या आरोग्य, मानवी सेवा अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीला संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखणारी प्रतिबंधक लस बनवण्यासाठी सरकारने आतापर्यंत एक अब्ज डॉलर्सची मदत केली आहे.

अमेरिकेत ३० हजार स्वयंसेवकांवर मॉर्डनाने अंतिम टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे. त्यातच कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत १.४६ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेत दररोज कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. मॉर्डनाची लस याआधी मानवी परिक्षणात यशस्वी ठरली होती.

मॉडर्नासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण या टप्प्यामध्ये एकाचवेळी मोठया प्रमाणावर मानवी चाचणी करण्यात येणार आहे. या टप्प्याच्या निकालावर बरेच काही अवलंबून असेल. या टप्प्यामधून लसीची नेमकी परिणामकारकता, उपयोगिता सिद्ध होईल. त्याचबरोबर मॉर्डनाचे प्रतिवर्षी ५० कोटी लसीचे डोस बनवण्याची लक्ष्य आहे.