मनसेच्या फायरब्रँड नेत्याला तडीपारीची नोटीस


ठाणे – दोन वर्षांसाठी तडीपार होण्यासाठी मनसेचे ठाणे शहराचे फायरब्रँड जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना नोटीस बजावण्यात आली असून याबाबतची माहिती स्वतः अविनाश जाधव यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर करुन दिली आहे. मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस अविनाश जाधव यांना बजावण्यात आली असून ही नोटीस वसई पालिका आयुक्तांच्या दालनात केलेल्या आंदोलन प्रकरणी बजावण्यात आली आहे. अविनाश जाधव यांना खुलासा करण्यासाठी ४ ऑगस्टला विरारमधील कार्यालयात हजर राहण्यास विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका बागडे यांनी सांगितले आहे.

ठाण्यामध्ये महापालिकेबाहेर कामावरुन काढण्यात आलेल्या नर्सेससाठी अविनाश जाधव आंदोलन करत असतानाच ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्ष मी सातत्याने लोकांसाठी आंदोलन करत आहे. मी कोणतेही आंदोलन स्वत:साठी केलेले नाही. जे आंदोलन वसईतही केले होते ते कोविड सेंटरसाठी केले होते. आजही विदर्भ, मराठवाडा, सांगली, सातारा येथून आलेल्या मुलींसाठी आंदोलन करत आहे. आंदोलन सुरु असतानाच मला तडीपारीची नोटीस आली आहे. मला दोन वर्षांसाठी मुंबई, ठाणे, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, रायगड या जिल्ह्यांमधून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

https://www.facebook.com/watch/?v=330214148383258

एवढे गुंड ठाण्यात आहेत ते हद्दपार होत नाही आणि लोकांसाठी सातत्याने मी भांडत असतानाही मला तडीपारीची नोटीस पाठवली. मग लोकांसाठी कोणी भांडायचे नाही का? माझी पहिली सभा झाली तेव्हा मला एक कोटींचा दंड लावला होता. मला तडीपारीच्या नोटीस त्याचदिवशी येतील असे म्हटले होते. मी लोकांचे काम करतो, समस्या सोडवत आहे म्हणून मला हे महाराष्ट्र शासनाकडून मिळालेले बक्षीस असल्याचे म्हणत अविनाश जाधव यांनी आपला संताप व्यक्त केला.

कोकणासाठी ज्या १०० बसेस मी सोडणार आहे त्याचे हे मिळालेले बक्षीस आहे. मी अनेक पोलिसांचे बिल कमी करण्यासाठी रुग्णालयाबाहेर जाऊन जे आंदोलन केले त्याचे हे महाराष्ट्र सरकारने दिलेले बक्षीस आहे. याच्यापुढे लोकांची काम करायची की नाही ? रस्त्यावर उतरायचे की नाही हे लोकांनी ठरवावे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.