कर्जबाजारी अनिल अंबानींवर मुख्यालय जप्त होण्याची नामुष्की


मुंबई – कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या अनिल अंबानीं यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्सवर आणखी एक नामुष्की ओढावली आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स समुहाविरोधात कर्ज थकल्यामुळे यस बँकेने कठोर कारवाई केली असून, मुंबईतील सांताक्रूझ येथील रिलायन्सचे कार्यालय जप्त करण्यासाठी नोटीस ऑफ पझेशन पाठवली आहे. रिलायन्सच्या मुख्यालयासोबतच मुंबईतील अन्य दोन कार्यालयांनाही अशा प्रकारची नोटीस बँकेने पाठवली आहे.

एकेकाळी उद्योग क्षेत्रात आघाडीवर असलेले आणि देशातील श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेले अनिल अंबानी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटातून जात आहेत. दरम्यान, यस बँकेने या कारवाईबाबत सांगितले की, बँकेने २ हजार ८९२ कोटी रुपयांचे कर्ज रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरला दिले होते. त्या कर्जाच्या वसुलीसाठी आता ही प्रक्रिया क्रमवारपद्धतीने करण्यात आली आहे. दरम्यान, नागिन महाल येथील रिलायन्सच्या कार्यालयाचे दोन मजले बँकेने आपल्या ताब्यात घेतले आहेत. थकबाकीदाराची संपत्ती जप्त करून त्याची विक्री करून आपल्या कर्जाची भरपाई करण्याचा बँकेला अधिकार असल्याचेही बँकेने स्पष्ट केले.

दरम्यान, सध्या यस बँकसुद्धा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. बॅड लोनचे ओझे बँकेवर वाढले असून, ते ओझे कमी करण्याच्या प्रयत्नात बँक आहे. बँकेने या कारवाईपूर्वी रिलायन्स ग्रुपला ६० दिवसांची नोटीस पाठवली होती. त्याची मुदत ५ मे रोजी संपुष्टात आली होती. पण कंपनी या कर्जाचा भरणा करण्यात अपयशी ठरल्यामुळे नियमानुसार बँकेने ही कारवाई केली आहे.