अमेरिकेच्या संसदेचे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील चार प्रमुख कंपन्यांवर गंभीर आरोप


न्यूयॉर्क : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अ‍ॅपल, अ‍ॅमेझॉन, फेसबूक, गुगल या चार सर्वात मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. आपल्या शक्तीचा गैरवापर करुन प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे. या चारही कंपन्यांच्या प्रमुखांना या आरोपांनंतर बुधवारी अमेरिकेच्या संसदेसमोर हजर रहावे लागले. अमेरिकन संसदीय समितीने यावेळी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चारही कंपन्यांचे प्रमुख सुंदर पिचाई (गूगल), जेफ बेजॉस (अ‍ॅमेझॉन), टिम कुक (अ‍ॅपल) आणि मार्क झुकेरबर्ग (फेसबुक) हजर राहिले. यावेळी या सर्वांवर या समितीतील सदस्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. अनेक कठोर प्रश्नांचा चारही कंपन्यांच्या प्रमुखांना सामना करावा लागला. चारही कंपन्यांवर रिपब्लिकन आणि डेमोक्रेट्स अशा दोन्ही पक्षाच्या सदस्यांकडून प्रश्नांचा पाऊस पडला. या सर्वांवर वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये वेगवेगळे आरोप आहेत. या सर्वांची संसदीय समितीने एकत्रित सुनावणी सुरु केली आहे.

या प्रकरणाचा एक वर्षापासून तपास सुरु असून यात संबंधित कंपन्यांनी त्यांच्या विस्तारासाठी आपल्या शक्तीचा विध्वंसक उपयोग केला. बाजारात आपली एकाधिकारशाही तयार व्हावी म्हणून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे अमेरिकन संसदीय समितीचे अध्यक्ष डेव्हिड सिसिलाईन (डेमोक्रेट) यांनी म्हटले.

गुगलवर कंटेन्ट चोरीचा आरोप अमेरिकन संसदेत झालेल्या या सुनावणीत समितीच्या सदस्यांनी लावला. यानुसार गुगल आपल्या वापरकर्त्यांना आपल्या वेबपेजवर टिकवून ठेवण्यासाठी Yelp सारख्या छोट्या फर्म्सचा कंटेन्ट चोरत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे हे आरोप चुकीचे असल्याचे सुंदर पिचाई (गूगल), जेफ बेजॉस (अ‍ॅमेझॉन), टिम कुक (अ‍ॅपल) आणि मार्क जकरबर्ग (फेसबुक) यांनी म्हटले. अमेरिकेची मुल्य लक्षात घेऊनच आम्ही सर्व गोष्टी करत असल्याचा दावा केला.

इतर छोट्या कंपन्यांनाच आमच्या कंपन्यांच्या उत्पादनांचा फायदा होत असल्याचेही या कंपन्यांच्या प्रमुखांनी म्हटले. तसेच आपण आजही नव्याने येणाऱ्या उद्योजकांसाठी स्पर्धेत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर व्यवसायाचे वातावरण नेहमीच स्पर्धेचे असते. स्मार्टफोन्सच्या व्यवसायात मार्केट शेअर नेहमीच रस्त्यावरील लढाईसारखे राहिले असल्याचे अ‍ॅपलचे प्रमुख टिम कूक यांनी म्हटले आहे.