5 ऑगस्टला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकणार राम मंदिराचे 3डी मॉडेल

5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभू रामाचे चित्र आणि राम मंदिराचा 3डी फोटो या दिवशी न्यूयॉर्कच्या प्रतिष्ठीत टाईम्स स्क्वेअरच्या विशाल होर्डिंग्सवर झळकणार आहे. भारतीय समुदायाचे नेते आणि अमेरिकेतील भारतीय लोकांच्या प्रकरणांच्या समितीचे अध्यक्ष जगदीश सेवानी यांनी या संदर्भात माहिती दिली. 5 ऑगस्टला न्यूयॉर्कमध्ये हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची तयारी केली जात आहे.

जगदीश सेवानी यांनी सांगितले की, या क्षणानिमित्ताने ज्या प्रमुख होर्डिंग्जला भाड्यावर घेण्यात आले आहे, त्यामध्ये विशाल नॅस्डॅक स्क्रीन आणि 17000 वर्ग फूट रॅप-अराउंड एलईडी डिस्प्ले स्क्रीनचा समावेश आहे. 17,000 वर्ग फूट रॅप-अराउंड स्क्रीन टाईम्स स्क्वेअरची सर्वोच्च रिझॉल्यूशन असणारी एलईडी स्क्रीन असल्याचे मानले जाते.

5 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हिंदी आणि इंग्रजीमध्ये जय श्री राम, प्रभू रामाचे चित्र आणि व्हिडीओ, मंदिराचे डिझाईन आणि वास्तूकलेचे 3डी फोटोसह पंतप्रधानांद्वारे भूमिभूजनाचे फोटो टाईम्स स्क्वेअरवर दाखवले जातील.

जगदीश सेवानी यांनी सांगितले की, भारतीय समितीचे लोक 5 ऑगस्टला टाईम्स स्क्वेअरवर उपस्थित असतील आणि या आनंदाच्या क्षणी मिठाई वाटतील.