कोरोनाचा असाही फायदा; महामारीमुळे या व्यक्तीचे 33 वर्ष जुने स्वप्न झाले पुर्ण

ज्या कोरोना व्हायरस महामारीने लाखो लोकांचे आयुष्य उद्धवस्त केले. त्याच महामारीने हैदराबादच्या एका व्यक्तीचे 33 वर्षांपासूनचे स्वप्न पुर्ण केले आहे. हैदराबादची ही व्यक्ती मागील 33 वर्षांपासून दहावीची परिक्षा पास करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्यात यशच मिळत नव्हते. मात्र कोरोना व्हायरस महामारीमुळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने, ही व्यक्ती देखील पास झाली.

हैदराबादच्या मुशीराबाद भागातील भोलकपूर अंजूमन बॉयस हायस्कूलमध्ये सध्या वॉचमन म्हणून काम करणारे 51 वर्षीय मोहम्मद नुरुद्दीन हे 1987 पासून दहावीची परीक्षा देत आहेत. पहिल्यांदा ते इंग्रजीमध्ये नापास झाले होते. त्यानंतर ते अनेक वर्ष परीक्षा देत होते, मात्र तरीही ते नापासच होते.

नुरुद्दीन यांना सरकारी नोकरी करायची होती, ज्यासाठी दहावी पास असणे गरजेचे आहे. त्यामुळे ते दरवर्षी परीक्षा देत होते. जेव्हा एसएससीकडून परीक्षा घेणे बंद झाले, त्यांनी एक्सटर्नल परीक्षा देण्यास सुरुवात केली. त्यात देखील ते नापास होत होते.

मात्र यावेळी कोरोना व्हायरसने त्यांचे स्वप्न पुर्ण केले. सरकारने दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केले आहे, ज्यामुळे नुरुद्दीन यांचे 33 वर्षांपासूनचे स्वप्न पुर्ण झाले.