नरेंद्र मोदींनी अशा प्रकारे केले राफेलचे स्वागत


नवी दिल्ली – मागच्या दोन-तीन वर्षांपासून येणार.. येणार.. म्हणून ज्याची चर्चा होती, ते ‘राफेल’ लढाऊ विमानाचे आज भारतात ‘हॅप्पी लँडिंग’ झाले आहे. यामुळे शत्रुच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे,तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. ही विमाने भारतीय भूमीवर उतरल्यानंतर त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा टि्वट केले आहे. राफेल विमानांच्या स्वागतासंदर्भात मोदींनी संस्कृतमध्ये एक श्लोक टि्वट केला आहे.

फ्रान्सबरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा करार २०१६ साली नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात झाला. काँग्रेसने या मुद्दावरुन २०१९ लोकसभा निवडणुकीच्याआधी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेलच्या खरेदी व्यवहारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले होते. पण सरकारला न्यायालयाकडून क्लीन चीट मिळाली. विरोधकांना भ्रष्टाचार झाल्याचे कुठेही सिद्ध करता आले नाही.

काँग्रेसने आज या विमानाच्या आगमनानंतर स्वागत केले आहे. तसेच हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर देशवासीयांना सरकारला काही प्रश्न विचारण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा पक्षी सुरक्षित उतरले असे ट्विट केले. राफेल विमानांचे भारतात दाखल होणे ही लष्करी इतिहासातील नव्या युगाची सुरुवात आहे. या बहुउपयोगी विमानामुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे.