पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बीसीजी लसीची तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल


पुणे : आपल्या देशात आणखी एक महत्वपूर्ण लसीची चाचणी सुरु झाली असून देशातील 6 हजार लोकांना फुफ्फुसाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी बीसीजी लस दिली जाणार आहे. पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटकडे त्याचे काम सोपवण्यात आले असून या चाचण्यांचा हा तिसरा टप्पा असणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला जैव तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल बायोफार्मा मिशन अंतर्गत रिकॉम्बीनंट बीसीजी लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या आयोजित करण्यासाठी सहाय्य देण्यात आले आहे. उच्च-जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा सह-आजार आणि उच्च-जोखीम असणाऱ्या आरोग्यसेवा (एचसीडब्ल्यू) कर्मचाऱ्यांमधील संसर्ग कमी करणे आणि कोरोनोचे गंभीर परिणाम कमी करण्यामध्ये व्हीपीएम 1002 च्या क्षमतेचे मूल्यांकन करणे हा या चाचणीचा हेतू आहे.

सर्व नवजात शिशुंना क्षयरोग (टीबी) रोग रोखण्यासाठी राष्ट्रीय बालपण लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून बीसीजी लसी नियमितपणे दिल्या जातात. फुफ्फुसांवर परिणाम करणाऱ्या जीवाणूंमुळे हा रोग प्रामुख्याने होतो. आरबीसीजी विषाणू लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढू शकते किंवा नाही हे तपासण्यासाठी कोविडच्या रूग्णांशी निकटचा संपर्क आलेल्या जवळपास 6,000 आरोग्य कर्मचारी आणि उच्च जोखमीच्या व्यक्तींची नावे क्लिनिकल चाचणीमध्ये नोंदवली आहेत.

बीआयआरएसीच्या सचिव डॉ. रेणु स्वरूप यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, बीसीजी लस हे एक तपासून घेतलेले औषध आहे आणि टीबी व्यतिरिक्त इतर रोगांवर त्याचे लक्ष्यित परिणाम शोधणे हा एक अतिशय व्यावहारिक दृष्टिकोन आहे. या प्रयोगाला मे 2020 मध्ये सुरुवात झाली आणि देशभरातील सुमारे 40 रुग्णालयांमधील 6000 लोकांची नोंदणी पूर्ण झाली आहे. हा आजार रोखण्याच्या मार्गांचा शोध घेणारा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि आम्ही या महत्त्वपूर्ण परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहोत.

आम्ही या अभ्यासामध्ये डीबीटी – बीआयआरएसी बरोबर भागीदारी करून आनंदी आहोत आणि या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होणाऱ्या चाचणीच्या सकारात्मक निकालांची अपेक्षा करतो, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एसआयआय) मालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी म्हटले आहे.

साथीच्या रोगाशी लढण्यासाठी अग्रभागी असलेले उच्च-जोखीम असलेले आरोग्य कर्मचारी, कोविड संसर्गित रूग्णांचा घरगुती संपर्क असलेले आणि कोविड–19 हॉटस्पॉट्स, प्रभावित भागात राहणारे किंवा काम करणारे, ज्यांना कोविड -19 संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक आहे. अशा लोकांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. आरबीसीजीच्या अशाच प्रकारच्या चाचण्यांना पॉल एरलिच इन्स्टिट्यूट (पीईआय) आणि हेल्थ कॅनडा यांनीही मान्यता दिली आहे.