आज भारतात होणार राफेलचे आगमन; अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात जमावबंदीचे आदेश


अंबाला : फ्रान्सहून रवाना झालेले पाच राफेल लढाऊ विमाने आज (29 जुलै) भारतात दाखल होणार आहेत. राफेल विमानांची पहिली बॅच आज सुमारे 7000 किमी प्रवास करुन अंबालाच्या एअरफोर्स स्टेशन येथे पोहोचतील. भारतात येताना विमाने 30 हजार फूट उंचीवर असताना त्यात इंधन भरण्यात आले. आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या राफेल विमानांच्या आगमनामुळे अंबाला एअरफोस्ट स्टेशन परिसरात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने तेथे कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आले आहे. त्याचबरोबर फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली आहे. चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.

अंबाला हे सामरिक महत्त्वाचे लष्करी तळ आहे. येथे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात आहे. त्याचबरोबर हवाई दलाचे मिग-21 ‘बायसन’ आणि जॅग्वार लढाऊ विमांनाचे स्क्वॉड्रनही येथेच तैनात आहेत. तसेच भारतीय सैन्याचा खड़्ग स्ट्राईक कोरचे (2 कोर) मुख्यालयही अंबाला एअरबेसच्या अतिशय जवळच असल्यामुळे हे संवेदनशील क्षेत्र असून शत्रूची त्यावर नजर असते.

राफेल लढाऊ विमाने दुपारी एक ते तीन दरम्यान कोणत्याही वेळी अंबाला एअरबेसवर पोहोचतील. आज अंबाला एअरफोर्स स्टेशनवर पाचही राफेल लढाऊ विमानांचे भारतीय हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया स्वागत करणार आहेत. छोटेखानी समारंभात राफेल विमाने हवाई दलात सामील केले जातील. या कार्यक्रमात मीडियालाही सहभागी होण्याची परवानगी नाही.

दरम्यान काल एअरफोर्स स्टेशनचा आर के एस भदौरिया यांनी दौरा केला आणि 17 गोल्डन एरो स्क्वॉड्रनची पुन्हा गठन केले. राफेलच्या स्वागताच्या तयारीचा एअर चीफ मार्शल यांनी आढावा घेतला. एलएसीवर तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन सीमेवर राफेल तैनात केले जाऊ शकते. भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना राफेल विमानांच्या उड्डाणासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.