लोकप्रिय भाकरवडी मालिकेच्या स्टाफ मेंबरचा कोरोनामुळे मृत्यू


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय भाकरवडी मालिकेच्या सेटवरील एका स्टाफ मेंबरचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना २१ जुलैला घडली आहे. जेडी मजिठिया निर्मित भाकरवडी मालिकेच्या सेटवरील एका स्टाफ मेंबरचा मृत्यू झाल्याच्या बातमीने सारेच हैराण झाले आहेत. या वृत्ताला खुद्द जे डी मजिठिया यांनी दुजोरा दिला. तसेच सेटवरील अनेकांना कोरोना झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान सेटवरील ज्या व्यक्तीचे निधन झाली, ती व्यक्ती प्रॉडक्शन हाऊसमध्ये शिवणकाम करत असे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या स्टाफची तब्येत १० जुलैपर्यंत ठीक होती. पण त्याला दुसऱ्या दिवशी थकवा जाणवायला लागला. या स्टाफला डॉक्टरांकडे जाण्याचा नर्सने सल्ला दिला. तेव्हा हा स्टाफ मेंबर डॉक्टरकडे गेला असताना डॉक्टरने त्याला औषध दिले. तो ठीकही झाला, पण त्याने १३ जुलैला आपल्या कुटुंबाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर भाकरवडी टीमला समजले की २१ जुलैला त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सेटवर घडलेल्या प्रकरणाबाबत भाकरवडीचे निर्माता जेडी मजिठिया यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की स्टाफ मेंबरला बरे वाटल्यानंतर त्याने डॉक्टरांचे सर्टिफिकेट दाखवल्यावर तो सुट्टी घेऊन घरी गेला होता. त्याच्या संपर्कात आम्ही सातत्याने होतो. पण त्याने आम्ही केलेल्या मेसेजेसला कोणताच रिप्लाय दिला नाही. जेव्हा आम्ही त्याला कॉल केला तेव्हा समजले की स्टाफ मेंबरचा मृत्य झाला आहे. आम्ही ही बातमी ऐकून खूपच हैराण झालो.

प्रॉडक्शन हाऊसने स्टाफ मेंबरचा मृत्यू झाल्यानंतर तातडीने बाकी कलाकार आणि क्रू मेंबरच्या स्वॅब परीक्षणाची व्यवस्था केली. कोकिलाबेन रुग्णालयातून चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली तसेच ७०हून अधिक लोकांचे स्वॅब परीक्षण करण्यात आले. यात अॅक्टर्स, टेक्निशियन, वर्कर्स, घरात काम करणारे, ड्रायव्हर, स्टुडिओ स्टाफ, सप्लायर इत्यादीचा समावेश होता. यातील अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सरकारी नियमांनुसार तीन दिवसांसाठी शूटिंग रोखण्यात आली. त्यानंतर शूटिंग करताना कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.