आयआरसीटीसी-एसबीआयने लाँच खास क्रेडिट कार्ड, मिळणार अनेक सुविधा

भारतीय रेल्वे कॅटेरिंग अँड टूरिझ्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) आणि एसबीआयने कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी एक खास कार्ड आणले आहे. या अंतर्गत प्रवाशांना केवळ तिकिट बुकिंग करताना सूटच नाही तर अन्य लाभ देखील मिळेल. आयआरसीटीसी आणि एसबीआयने आपले सह-ब्रँड रुपे क्रेडिट कार्ड सादर केले आहे.

या संदर्भात माहिती देताना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, 25 डिसेंबरपर्यंत 3 कोटी ग्राहकांपर्यंत हे कार्ड पोहचण्याचे लक्ष्य आहे. आयआरसीटीसी ग्राहकांची संख्या 5 कोटींपेक्षा अधिक आहे व हे ग्राहक दररोज साडेआठ लाखांचा व्यवहार करतात. गोयल म्हणाले की, केंद्र सरकारने येणाऱ्या काळात प्रत्येक तिकिटाचे ऑनलाईन बुकिंग सह-ब्रँडच्या कार्डाद्वारे करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. खरेदी, मनोरंजन इत्यादी गोष्टींसाठी कार्ड वापरल्यावरही अनेक फायदे मिळतील.

आयआरसीटीसीवर या कार्डद्वारे तिकिट बुकिंगच्या पेमेंटनंतर ग्राहकांना रेल्वेच्या वातानुकूलित वर्गांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय, एग्झिक्यूटिव्ह चेअरकार, एसी चेअरकारच्या भाड्यावर 10 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. याशिवाय तिकिट बुक करण्यासाठी लागणारे शुल्क देखील माफ असेल. रेल्वे स्टेशनवरील प्रिमियन लॉजमध्ये प्रत्येक तिमाहीत एकदा मोफत प्रवेश असेल.

या कार्डमध्ये एनएफसी (निअर फिल्ड कम्यूनिकेशन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डचा वापर करून कॉन्टॅक्टलेस व्यवहार करता येतील.