आनंदवार्ता! ऑगस्टच्या मध्यापर्यंत रशिया सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करणार कोरोना प्रतिबंधक लस


मॉस्को – संपूर्ण जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटाचा भारतासह सर्व जग एकजूटीने सामना करत आहते. पण याच दरम्यान कोरोनाविरोधात लढायला अजून बळ देणाऱ्या सकारात्मक बातम्या जगभरातून येत आहे. कोरोना प्रतिबंधक लस विकासित केल्याचा दावा रशियाने काही दिवसापूर्वी केला होता. आता त्याच्या पुढे जात रशियाने आता ऑगस्टच्या मध्यापर्यंत ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी केली आहे.

दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळेत जगातील सर्वात पहिल्या कोरोनावरील लसीला रशियन सरकार मंजुरी देऊ शकते, असे वृत्त सीएनएनने दिले आहे. रशियन अधिकाऱ्यांनी या लसीबाबत सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीला मंजुरी देण्यासाठी १० ऑगस्ट किंवा त्यापूर्वीच्या तारखांवर काम करण्यात येत आहे. मॉस्कोमधील गमलेया इंस्टिट्युटने ही लस विकसित केली आहे.

ही लस आता सर्वसामान्यांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगिले. तसेच सर्वप्रथम फ्रंटलाइन हेल्थकेअर वर्कर्सना ही लस देण्यात येईल. कोरोनावरील लस विकसित केल्याचा दावा रशियाने केला असला तरी या लसीबाबतचा कुठलाही डेटा प्रसिद्ध केलेला नसल्यामुळे या लसीच्या उपयुक्ततेबाबत कुठल्याही प्रकारचे विधान करता येणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे.

लवकरात लवकर कोरोनावरील लस तयार करण्यासाठी रशियामध्ये राजकीय दबाव आणण्यात येत असून, संशोधनक्षेत्रातील शक्ती म्हणून रशियाला पुढे आणण्यासाठी राजकीय नेतृत्व उत्सुक आहे. दरम्यान, रशियात विकसित करण्यात आलेल्या लसीच्या अपूर्ण चाचण्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.