कोरोनाचे इफेक्ट्स; वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मारुती सुझुकीला 250 कोटींचे नुकसान

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक परिणामांची घोषणा केली आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीमध्ये कंपनीने एकूण 3677.5 कोटी रुपयांची विक्री केली. जी मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के कमी आहे. 30 जूनला समाप्त झालेल्या कालावधीत कंपनीला एकूण 249.4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी कंपनीला पहिल्या तिमाहीत 1435.5 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मागील 17 वर्षात पहिल्यांदाच कंपनीला एखाद्या तिमाहीत नुकसान झाले आहे. या संदर्भात एनडीटिव्हीने वृत्त दिले आहे.

या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये देखील काही प्रमाणात घसरण आली. कोरोना व्हायरस महामारीमुळे भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला होता. एप्रिलच्या संपुर्ण महिन्यात काम पुर्णपणे बंद होते. यामुळे या तिमाहीच्या एक महिन्यात शून्य उत्पादन आणि शून्य विक्री झाली.

विक्रीनुसार, मारुती सुझुकीने तिमाहीत एकूण 76,599 वाहनांची विक्री केली. स्थानिक बाजारात 67,027 विक्री केली, तर 9572 कार्स निर्यात करण्यात आल्या.