चंद्रकांत पाटलांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झाले ;रोहित पवार


मुंबई – राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर वेगवेगळ्या मुद्यावरून विरोधी बाकावर असलेल्या भाजपकडून वारंवार टीका केली जात असल्यामुळे राज्यात महाविकास विरूद्ध भाजप यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यास तयार असल्याचे म्हटले होते. आता त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारीच राज्यातील भाजप महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेत असल्याचे अधोरेखित केलेले असतानाच काल शिवसेनेबाबत सौम्य भूमिका घेत, युतीसाठी दरवाजे उघडे असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

याबाबत रोहित पवार यांनी एक ट्विट केले असून त्यात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या नावाचा उल्लेख न करता टीका केली आहे. आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं BJP तील एक मोठे नेते म्हणाले.सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात BJP पासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले तरी किमान मला एकट्याला तरी #MVA त घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!!, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.