नियमित कर भरणाऱ्या 117 वर्षीय महिलेचा आयकर विभागाकडून सन्मान

मध्य प्रदेशमध्ये आयकर विभागाने नियमितरित्या कर भरणाऱ्या 100 पेक्षा अधिक वय असणाऱ्या चार महिलांना सन्मानित केले आहे. यातील एक महिला 117 वर्षांची आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विभागाच्या 160व्या स्थापना दिनानिमित्ताने व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आयकर विभागाने मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यातील बीना येथील गिरिजा बाई तिवारी (117), इंदौरच्या ईश्वरीबाई लुल्ला (103) आणि कंचन बाई (100) यांच्या व्यतिरिक्त छत्तीसगडच्या बिलासपूर येथील 100 वर्षीय बीना रक्षित यांना सन्मानित केले.

मध्य प्रदेश-छत्तीसगडच्या आयकर विभागाचे मुख्य आयुक्त एके चौहान यांना गिरिजा बाई जगातील सर्वात वृद्ध आयकरदाता असल्याचे विचारले असता, ते म्हणाले की मला याबाबत कोणतीही निश्चित माहिती नाही. मात्र पॅन कार्डच्या आधारावर दोन्ही राज्यातील त्या सर्वात वृद्ध आयकरदाता मात्र आहेत.