घरी बसलेल्या विराट कोहलीने रचला विक्रम


नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या आक्रमकपणामुळे क्रिकेट विश्वात ओळखला जातो. त्याचबरोबर त्याची आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये त्याची गणती होते. त्यातच त्याने जेव्हापासून भारतीय संघाचे नेतृत्व करायला सुरूवात केल्यापासून तर त्याचा खेळ अजूनच बहरला आहे. क्रिकेटच्या मैदानात जेवढा विराट लोकप्रिय आहे, तेवढाच तो सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे. विराटने इन्स्टाग्रामवर नुकतीच आपली १०००वी पोस्ट शेअर केल्यानंतर आता त्याने आता घरबसल्या एक नवा विक्रम रचला आहे.

इन्स्टाग्रामवर ७० मिलियन फॉलोअर्सचा टप्पा विराटने पार केला आहे. विराटचे सध्या इंस्टाग्रामवर ७०.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर क्रीडाविश्वात विराटने चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. विराटने बास्केटबॉल खेळाडू लीब्रोन जेम्स याला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे. विराटने 70 मिलियनचा टप्पा गाठणारा पहिलावहिला भारतीय असा विक्रम केला आहे. क्रीडापटूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोर्तुगालचा क्रिस्टीआनो रोनाल्डो आहे. २३२ मिलियन त्याचे फॉलोअर्स आहेत. त्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानी अर्जेंटिनाचा लियोनल मेसी हा १६१ मिलियन फॉलोअर्ससह आहे. तर १४० मिलियन फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार ज्युनियर आहे. विराट भारतीयांच्या यादीत ७० मिलियनचा आकडा गाठणारा एकमेव व्यक्ती आहे. त्यापाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही ५५ मिलियन फॉलोअर्स संख्येसह दुसऱ्या स्थानी आहे.

२००८ साली विराटने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यातील अगदी तरूणपणातील एक फोटो विराटने घेतला. तसेच भारताने लॉकडाउन आधी खेळलेल्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी गणवेशातील फोटोही त्याने घेतला. हे दोन फोटो अतिशय छान पद्धतीने मर्ज करून विराटने एक फोटो पोस्ट केला. इन्स्टाग्रामवरील विराटची ही फोटोपोस्ट हजारावी पोस्ट ठरली.