२२ किलो वजनाची चांदीची वीट ठेवून रचला जाणार राम मंदिराचा पाया


नवी दिल्ली – ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील प्रभू राम मंदिराचे भूमिपूजन केले जाणार आहे. २२ किलो ६०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट ठेवून या दिवशी पाया रचला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही या वीटेवर लिहिण्यात आले आहे. तसेच जय श्रीराम असेही लिहिण्यात आले आहे. एवढेच नाहीतर या विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही लिहिण्यात आला आहे. राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केले जाणार आहे. त्याचबरोबर भूमिपूजन करण्यासाठी देशातील पवित्र नद्यांचे पाणीही आणले जाणार आहे. तसेच पवित्र मातीही आणली जाणार आहे. त्यासंबंधीची तयारी सुरु करण्यात आली आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तींना भूमिपूजनच्या दिवशी रत्नजडित पोशाख घातला जाणार आहे. हे पोशाख या मूर्तींना रामदल सेवा ट्रस्टचे पंडित कल्कीराम परिधान करतील. बुधवारी भूमिपूजन होणार असल्यामुळे त्या दिवसाचा रंग हिरवा असतो त्यामुळे प्रभू रामचंद्र हे हिरव्या रंगाच्या पोशाखात दिसतील.