सोनू सूदचे कौतुक करावे तेवढे कमीच; आता इंजिनिअर महिलेला मिळवून दिली नोकरी

कोरोना व्हायरस महामारीने मागील 4-5 महिन्यात आपल्या आजुबाजूची परिस्थिती पुर्णपणे बदलून टाकले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. नोकरी गेल्याने पदवीधर, पदव्युत्तर लोकांना भाजी विकावी लागत आहे किंवा इतर कामे करावी लागत आहेत.

हैदराबादमधील इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या 26 वर्षीय उंडाडी शारदा यांनी देखील लॉकडाऊनमध्ये आपली नोकरी गमावली. नोकरी गेल्याने पैशांसाठी अखेर त्यांनी भाजी विकण्यास सुरूवात केली. इंजिनिअर असतानाही नोकरी मिळत नसल्याने घर चालविण्यासाठी त्यांना हे काम करावे लागत होते. शारदा म्हणाल्या की, या कामामुळे त्या घराचे भाडे भरू शकत आहे.

एका ट्विटर युजरने अभिनेता सोनू सूदला टॅग करत शारदाची माहिती शेअर केली. लॉकडाऊनच्या काळात सर्वांची मदत करणाऱ्या या अभिनेत्याने देखील त्वरित ट्विटची दखल घेत, महिलेला नोकरी देण्यात आल्याची माहिती दिली.

काही दिवसांपुर्वीच सोनू सूदने कामगारांना रोजगार देण्यासाठी एक अ‍ॅप लाँच केले होते. सोनू सूदने त्वरित ट्विटची दखल घेत नोकरी गेलेल्या या महिलेला नोकरी दिल्याने नेटकरी त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.