कोरोनाच्या संकटकाळात पुण्यात घडली देशातील एकमेव दुर्मिळ घटना


पुणे – जगासह देशावर ओढावलेल्या कोरोना संकटाकाळत पुण्यात एक दुर्मिळ घटना घडली आहे. आईच्या गर्भात असतानाच बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही देशातील पहिलीच आणि एकमेव घटना आहे. यापूर्वी प्रसुतीनंतर बाळाला कोरोनाची बाधा झाल्याचे आपल्या ऐकण्यात आले असेल गर्भात असतानाच कोरोनाची लागण झाल्याची ही देशातील पहिली घटना असल्याचे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

हडपसर परिसरात राहणारी एक २२ वर्षीय गर्भवती महिला ससून रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसुतीच्या एक दिवस अगोदर ताप आल्याने ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालयात भरती झाली होती. आरटी-पीसीआरद्वारे महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिची अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली, त्यात महिलेला कोरोना असल्याचे निदान झाल्याची माहिती इंडियन एक्सप्रेसला बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. आरती किनीकर यांनी दिली. बाळात अनेक लक्षण दिसून आली होती आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागेल, हे सगळे खूप आव्हानात्मक असल्याचेही त्या म्हणाल्या.

बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या नाकातील स्वॅ घेण्यात आला. त्याचबरोबर नाळ आणि नाभीच्या तपासणीनंतर त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. आरटी-पीसीआरद्वारे बाळाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. २४ ते ४८ तासाच्या आतच बाळात कोरोनाची लक्षणे दिसून आली. बाळामध्ये तापासह कोरोनाची अनेक लक्षणे दिसून आली. बाळाची नाभी आणि नाळातील संसर्ग ओळखण्यास सक्षम होतो. आईलाही संसर्ग झालेला होता, पण त्याची काही लक्षणे दिसत नसल्याचे किनीकर म्हणाल्या. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय जर्नलकडे या केस संदर्भातील आमचा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी पाठवला होता. तो स्वीकारण्यात आला आहे. काल रात्री आम्हाला त्याचे स्वीकृती पत्रही मिळाल्याची माहिती किनीकर यांनी दिली.

बाळाची प्रसुतीनंतर व्यवस्थितपणे काळजी घेण्याची गरज होती आणि त्याप्रकारे काळजी घेतली गेली. बाळ तीन आठवड्यानंतर पूर्णपणे बरे झाले. बाळाला जून महिन्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितले.

अशा पद्धतीने एचआयव्ही आणि झिका व्हायरसमध्ये संसर्ग झाल्याच्या नोंदी आहेत. पण अशा पद्धतीचे संक्रमण कोरोनामध्ये होण्याबद्दलची माहिती दुर्मिळ आहे. व्हर्टिकल ट्रान्समिशन होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचे डॉ. तांबे म्हणाले. मागील दहा दिवसांच्या काळात ससूनमध्ये ४२ कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलांची प्रसुती झाली आहे. त्यापैकी सहा बाळांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पण हा संसर्ग प्रसुतीनंतर झाला होता.