ट्रम्प यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला कोरोनाची लागण

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस महामारीने जगभरात थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे सर्वाधिक नुकसान अमेरिका, ब्राझील आणि भारत या देशांना झाले आहे. अमेरिकेत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. आता कोरोना व्हायरसने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान असलेल्या व्हॉईट हाऊसमध्ये देखील शिरकाव केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. व्हॉईट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे. व्हॉईट हाऊसने याविषयी माहिती देताना सांगितले की, ट्रम्प प्रशासनामध्ये महत्त्वपुर्ण भूमिका पार पाडणारे ओ ब्रायन आयसोलेशनमध्ये आहेत व तेथूनच काम करत आहेत.

व्हॉईट हाऊसने स्पष्ट केले की, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांना संसर्गाचा कोणताही धोका नाही.

दरम्यान, अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला असून, जवळपास दीड लाख लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.