चीनमधील प्रमुख डॉक्टराचा कोरोनाच्या प्रसाराबाबत खळबळजनक दावा


बिजिंग – जगभरातील बहुतांश देशांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जीवघेण्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून याचे उगम स्थान असलेल्या चीनवर जगभरातील अनेक देशांनी या रोगाची माहिती लपवल्याचा आरोपही केला होता. पण हे आरोप चीनने वारंवार फेटाळण्यात आले आहेत. याच दरम्यान चीनमधील प्रमुख डॉक्टरने कोरोनाच्या प्रसाराबाबत खळबळजनक दावा केला आहे. चीनच्या प्रशासनाने कोरोना महामारीबाबतची महत्त्वपूर्ण माहिती लपवल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर वुहानच्या बाजारपेठेत तपासणीसाठी येण्यापूर्वीच सर्व पुरावे नष्ट केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

कोरोनाबाबतचे सर्व पुरावे चीनने नष्ट केल्याचा आरोप कोरोनाच्या सुरूवातीच्या काळात यावर तपास करणारे डॉक्टर क्वोक युंग युएन यांनी बीबीसीशी बोलताना केला आहे. त्याचबरोबर सुरूवातीच्या काळात वैद्यकीय तपासाचा वेगही कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही युनानच्या सुपरमार्केटमध्ये जेव्हा गेलो त्यावेळी आम्हाला त्या ठिकाणी काहीच सापडले नाही. मार्केट आधीच स्वच्छ करण्यात आले होते. त्यामुळे घटनास्थळ पहिलेच बदलण्यात आल्याचे म्हटले तरी चालेल, असं क्वोक युंग युएन म्हणाले.

मार्केट आम्ही जाण्यापूर्वीच साफ केल्यामुळे आम्हाला कोणत्या गोष्टींमुळे हा व्हायरस मानवात पसरला याची माहिती मिळाली नाही. वुहानमध्ये या प्रकरणावर पडदा घालण्यासाठी त्यांनी काहीतरी केल्याची मलाही शंका असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्या स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती पुढे पाठवायची होती त्यांनी योग्यरित्या काम न करू दिल्याचेही क्वोक युंग युएन म्हणाले.