बंदी घातलेल्या चिनी अॅपचा भाजपकडूनच वापर; नेटकऱ्यांनी धारले धारेवर


नवी दिल्ली – लडाखमधील गलवाण खोऱ्यात चीनने केलेल्या आगळीकनंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव निर्माण झाला होता. भारताने या तणावाच्या पार्श्वभूमीवरच ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता पुन्हा एकद चिनी अ‍ॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे आणि यामागे कारण देखील सत्ताधारी भाजप ठरला आहे. भाजपने बंदी घातलेल्या बॅन केलेल्या CamScannerच्या साहाय्याने सोशल मीडियावर प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीचे पत्र पोस्ट केल्यानंतर ही चूक लक्षात आलेल्या नेटकऱ्यांनी भाजपलाच चांगले धारेवर घेतले आहे.

आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी भाजपने सोमु वीर्राजू यांची नियुक्ती केली आहे. पण, सोमु वीर्राजू यांची ही नियुक्ती CamScanner या चिनी अ‍ॅपच्या वापरामुळे चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमु वीर्राजू यांची नियुक्ती केली. सोशल मीडियावर त्यांच्या नियुक्तीचे पत्र टाकण्यात आले. पण हे पत्र CamScanner या चिनी अ‍ॅपने स्कॅन केलेले आहे. तसा उल्लेखही या पत्राच्या शेवटी दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी ही चूक लक्षात आणूण देताच भाजपने ते ट्विट डिलीट केले. पण तोपर्यंत चिनी अ‍ॅप CamScanner ने Scan केलेले हे पत्र सगळीकडे व्हायरल झाले होते. आता त्यावरुन ट्विटरवर भाजपला ट्रोल केले जात आहे.

एक नेटकऱ्याने असे म्हटले आहे की, भारतात CamScanner या चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. पण सत्ताधारी पक्षच त्यांच्या कार्यालयीन कामासाठी याचा वापर करत आहे. हे अ‍ॅप त्यांनी काढून टाकलेले नाही. तर एका युझरने AdobeScan वापरण्याचा सल्ला दिला आहे. हे ट्विट भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी डिलीट केले आहे. पण मला खात्री नाही की त्यांनी हे चिनी अ‍ॅपही त्यांच्या फोनमधून डिलीट केले असेल. या पत्रामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी भाजपवर निशाणा साधला असून, टीकेबरोबरच सल्लेही दिले जात आहेत.