भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे संविधानाच्या शपथेविरोधात


हैदराबाद – पुढील महिन्याच्या ५ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा कार्यक्रम काही ठराविक लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. पण यावरून पंतप्रधानांवर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी जाणे हे संविधानाच्या शपथेविरोधात असल्याचे मत ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी उपस्थित राहणे हे संविधानाच्या शपथेच्या विरोधात आहे. संविधानाचा धर्मनिरपेक्षता हा महत्त्वाचा भाग आहे. ४०० वर्षांपर्यंत अयोध्येत बाबरी मशीद उभी होती. पण १९९२ मध्ये ती काही गुन्हेगारांच्या गटाने पाडली हे आम्ही विसरणार नसल्याची टीका ओवेसी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन केले जाणार आहे. सकाळी साडे अकरा वाजता या ठिकाणी पंतप्रधान पोहोचतील. त्यानंतर ते सर्वांना संबोधित करणार आहे. जवळपास निमंत्रितांसह २०० जण या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांची यादीही पंतप्रधान कार्यालयाला सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.