फेक न्यूज प्रकरणी जॅक मा यांना भारतीय न्यायालयाची नोटीस


नवी दिल्ली – भारतीय न्यायालयाने चीनमधील सर्वात मोठी ऑनलाइन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांना भारतीय कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने कामावरुन काढून टाकल्या प्रकरणी ही नोटीस पाठवली आहे. कंपनीच्या अ‍ॅपवर सेन्सॉरशीप असणाऱ्या आणि खोट्या बातम्या असल्याचे कंपनीने कारवाई केलेल्या या कर्मचाऱ्याने निदर्शनास आणून दिल्यानंतरच त्याच्यावर या कर्मचाऱ्याने कारवाई करण्यात आल्याचा दावा कागदपत्रांच्या आधारे केला असल्याचे आपल्या वृत्तात रॉयटर्सने म्हटले आहे.

हे प्रकरण भारत सरकारने अलिबाबाच्या यूसी न्यूज, यूसी ब्राउझरसह इतर ५७ चीनी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर समोर आले आहे. चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने चीनसोबत लडाखमध्ये सुरु असणाऱ्या संघर्षामुळे घेतला आहे. बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅपच्या सर्व कंपन्यांकडून भारत सरकारने लेखी स्पष्टीकरण मागवले आहे. यामध्ये कंपनी काही माहिती सेन्सॉर करते का किंवा इतर देशाच्या सरकारसाठी काम करते का अशा प्रश्नांसंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. पण चीनने या बंदीचा निषेध केला आहे.

२० जुलै रोजी अलिबाबा ग्रुपच्या यूसी वेब कंपनीमध्ये काम करणाऱ्या पुष्पेंद्र सिंग परमार यांनी चीनच्या विरोधातील माहिती कंपनीच्या अ‍ॅपवर सेन्सॉर करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयामध्ये दाखल केली आहे. तसेच सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होणाऱ्या खोट्या बातम्या यूसी ब्राउझर आणि यूसी न्यूज या अ‍ॅपवर दाखवल्या जात असल्याचे परमार यांनी म्हटले आहे. ही याचिका गुरुग्रामच्या दिवाणी जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. अलिबाबा, जॅक मा यांच्याबरोबर कंपनीशी संबंधित एक डझनभर लोकांना आणि कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांना या प्रकरणात न्यायलयाने नोटीस पाठवली आहे.

२९ जुलैच्या सुनावणी रोजी न्यायालयासमोर सर्वांनी प्रत्यक्ष किंवा वकिलाच्या माध्यमातून हजर रहावे असे या नोटीसमध्ये म्हटलं आहे. तसेच कंपनी आणि या प्रकरणाशी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ३० दिवसांमध्ये न्यायालयासमोर लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

याप्रकरणा संदर्भात बोलताना यूसी इंडियाने आमची कंपनी भारतीय बाजारपेठ आणि तेथील स्थानिक कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असून स्थानिक कायद्यांचे कंपनीची धोरणे पालन करतात. चालू असलेल्या खटल्यांबाबत आम्ही कोणतेही भाष्य करु इच्छित नसल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात कंपनी किंवा जॅक मा यांच्याबाजूने कोणतेही वक्तव्य करण्यास अलिबाबा कंपनीच्या प्रतिनिधिंनीही नकार दिला आहे.

परमार यूसी वेबमध्ये सहाय्यक निर्देशक म्हणून ऑक्टोबर २०१७ पर्यंत काम करत होते. आता कंपनीकडून त्यांनी २ लाख ६८ हजार डॉलर्सच्या भरपाईची मागणी केली आहे. चीन सरकार तेथील कंपन्यांना परदेशामध्ये व्यवसाय करताना आंतरराष्ट्रीय कायद्यांचे आणि नियमांचे पालन करण्याचा सल्ला देते असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.